पतीला शरिरसंबंध ठेवण्यास नकार देणे हा एक प्रकारचा छळच | मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Last updated on July 22nd, 2025 at 09:38 pm

लग्न हे प्रेम, विश्वास, जवळीक, कौटुंबिक जिव्हाळा अशा विविध गोष्टींवर आधारलेले नाते आहे. सुखी संसार करण्यासाठी दोघांमध्ये या गोष्टींची नितांत गरज आहे. याचबरोबर शारीरिकदृष्ट्या जवळीक तितकीच महत्वाची असते. मुंबई उच्च न्यायालयाने हीच गरज अधोरेखित करणारा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. पत्नीने पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे, पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करणे तसेच मित्रांसमोर पतीसमोर अपमान करणे ह्या सर्व गोष्टी म्हणजे पत्नीने पतीसोबत केलेली क्रूरता आहे, असे स्पष्ट मत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने एका प्रकरणात व्यक्त केले आणि घटस्फोटाला आव्हान देणारे महिलेचे अपिल फेटाळून लावले.

याचिकाकर्त्या महिलेने पुण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. पुणे कुटुंब न्यायालयाने 28 नोव्हेंबर 2019 रोजी याचिकाकर्त्या महिलेच्या पतीला क्रूरतेच्या कारणावरुन घटस्फोट मंजूर केला होता. या दाम्पत्याचे 12 डिसेंबर 2013 रोजी लग्न झाले होते. मात्र वर्षभरातच दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाले आणि 14 डिसेंबर 2014 रोजी दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. सुरुवातीला एप्रिल 2015 मध्ये दोघांनी परस्परसंमतीने घटस्फोटासाठी अर्ज केले होते. तथापि, जुलै 2015 मध्ये महिलेने तिला जबरदस्तीने याचिका दाखल करण्यास भाग पाडले गेल्याचा आरोप केला आणि घटस्फोटासाठी दिलेली संमती मागे घेतली. नंतर तिने पती व त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि पतीसोबत पुन्हा संसार करण्याची इच्छा व्यक्त करीत घटस्फोटाचा आदेश रद्द करण्याची विनंती केली. महिलेने याचिकेत पतीवर आरोप न करता सासरच्या लोकांना दोष दिला. सासरच्या लोकांनी माझा छळ केला. माझे पतीवर प्रेम असून लग्न संपुष्टात येऊ नये, अशी माझी इच्छा आहे, असे म्हणणे महिलेच्या वतीने न्यायालयात मांडण्यात आले. याचवेळी तिने पतीकडून दरमहा 1 लाख रुपयांची पोटगी मागत त्यासंदर्भात निर्देश देण्याची विनंतीही न्यायालयाला केली होती. तथापि, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डाॅ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने तिचे अपिल फेटाळले.

याचिकाकर्त्या महिलेनेच पतीचा छळ केला असल्याच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे निरिक्षण खंडपीठाने नोंदवले. पती हा त्याच्या कुटुंबाच्या व्यवसायाचा एक भाग आहे. या प्रकरणातील पत्नीने पतीच्या कर्मचाऱ्यांसोबत केलेले वर्तन नक्कीच पतीला त्रास देणारे आहे. तसेच पतीला त्याच्या मित्रांदेखत अपमानित करणे, पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे आणि पतीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप करणे या सर्व गोष्टी पतीच्या बाबतीत केलेली क्रूरता आहे. महिलेचे वर्तन पाहता तिला नातेसंबंध टिकवून ठेवण्यास खऱ्या अर्थाने रस नसल्याचेच स्पष्ट दिसून आले. त्याउलट पतीने त्याच्या बाजूने अनेकदा नातेसंबंध कायम ठेवण्याबाबत विश्वासार्ह पावले उचलली होती, असे निरिक्षण खंडपीठाने नोंदवले आणि महिलेला दिलासा देण्यास नकार दिला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *