शिक्षकांनी विद्यार्थ्याला ओरडणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे | सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Last updated on July 22nd, 2025 at 08:48 pm
शिक्षकांनी कोणत्याही विद्यार्थ्याला ओरडणे, हा संबंधित विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरत नाही – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली- शाळेमध्ये शिक्षक मुलांना चांगले संस्कार करण्याच्या हेतूने ओरडत असतात. यावरुन शिक्षकांना दोष देता येणार नाही. याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. शिक्षकांनी कोणत्याही विद्यार्थ्याला ओरडणे हा संबंधित विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमनुल्लाह आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने दिला आहे. हा निर्वाळा देत खंडपीठाने तामिळनाडूतील शिक्षकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातून दोषमुक्त केले.
यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने अपिलकर्त्या शिक्षकाला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यास नकार दिला होता. त्या निर्णयाला शिक्षकाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती
अमनुल्लाह यांच्या खंडपीठाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवत शिक्षकाला मोठा दिलासा दिला.
शिक्षक ओरडल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्याने स्वतःचा जीव घेतल्याची दुःखद घटना घडेल, अशी कल्पनाही कोणत्याही सामान्य व्यक्तीला करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी चिथावणी देणे किंवा कृत्य करण्यास जाणूनबुजून मदत करणे यासारखे घटक सिद्ध करणे आवश्यक आहे. अशा घटकांच्या सबळ पुराव्यांशिवाय आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा सिद्ध होत नाही, असे न्यायालयाने म्हटले.