बेदरकार ड्रायव्हिंग करणाऱ्या चालकाच्या मृत्यूबद्दल भरपाई नाही | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Last updated on July 22nd, 2025 at 08:25 pm

नवी दिल्ली – बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यूमुखी होणाऱ्या चालकाच्या कायदेशीर वारसांना भरपाई देण्यास विमा कंपन्या बांधील नाहीत, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. जी. नागरत्ना व इतर विरुद्ध जी. मंजुनाथ व इतर या प्रकरणात न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

२०१४ मध्ये कर्नाटकात कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एन. एस. रविशाच्या पत्नी, मुलगा व पालकांनी भरपाईसाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाने त्यांचा भरपाईचा दावा फेटाळला. नोव्हेंबर २०२४ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीविरोधातील कुटुंबाचा ८० लाख रुपयांचा भरपाईचा दावा फेटाळला होता. उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण दिसून येत नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. जो अपघात झाला होता, तो केवळ चालक रविशाच्या स्वतःच्या चुकीमुळे झाला होता. अशा परिस्थितीत मोटार वाहन कायद्याच्या कलम १६६ अंतर्गत दावा मान्य करता येणार नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता.

१८ जून २०१४ रोजी रविशा हा मल्लासांद्रा गावाहून अरासिकेरे शहराच्या दिशेने फियाट लाइनिया कार चालवत होता. त्यावेळी कारला अपघात झाला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रविशा बेदरकार आणि निष्काळजीपणे कार चालवत होता. त्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले होते. मायलानहल्ली गेटजवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली होती. त्यात त्याच्या डोक्याला दुखापत होऊन मृत्यू झाला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *