निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी सर्व मालमत्ता जाहीर करणे गरजेचे नाही | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Last updated on July 18th, 2025 at 11:44 pm

नवी दिल्ली – निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी आपली सर्वच मालमत्ता ती जाहीर करणे गरजेचे नाही. उमेदवाराच्या प्रत्येक मालमत्तेचा तपशील जाणून घेण्याचा मतदारांना पूर्ण अधिकार नाही, असा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच न्यायालयाने हा निर्णय देत उमेदवारांना दिलासा दिला.

अरुणाचल प्रदेशच्या तेझु विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार कारीखो क्री यांची निवड गुवाहाटी उच्च न्यायालयाने अवैध ठरवली होती. २०१९ मध्ये कारीखो यांनी उमेदवारी अर्ज भरताना पत्नी व मुलांच्या नावावर असलेल्या तीन गाड्यांचा तपशील जाहीर केला नव्हता, असा दावा पराभूत उमेदवाराने केला होता. हा दावा मान्य करीत गुवाहाटी उच्च न्यायालयाने कारीखो यांना अपात्र ठरवले होते. त्या निर्णयाला कारीखो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांच्या अपिलावर न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. कारीखो यांची निवड योग्य ठरवत खंडपीठाने गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. त्यामुळे कारीखो यांना मोठा दिलासा मिळाला.

निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना महागड्या किंमतीच्या वस्तूंचा तपशील उमेदवारी अर्ज भरताना द्यावाच लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत महागड्या घड्याळाचे उदाहरण दिले आहे. जर उमेदवार किंवा त्याच्या कुटुंबियांच्या मालकीची महागड्या किमतीची घड्याळे असतील, तर या घड्याळांचा तपशील उघड केलाच पाहिजे. कारण अशा महागड्या वस्तूंतून उमेदवाराची आलिशान जीवनशैली उघड होते, असे न्यायालयाने नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *