प्रोबेशनवर असतानाही प्रसूती रजेचा हक्क | MAT

Last updated on July 17th, 2025 at 07:52 pm
– मॅटचा महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा.
मुंबई – नोकरीत ‘प्रोबेशन’वर असतानाही प्रसूती रजा घेण्याचा महिला कर्मचाऱ्यांना हक्क आहे. ‘प्रोबेशन’ कालावधीत प्रसूती रजा नाकारली जाऊ शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल देत मॅटने महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
२०१५ मध्ये सहाय्यक वनसंरक्षक पदावर कार्यरत महिलेला प्रोबेशन कालावधीत प्रसूती रजा नाकारण्यात आली होती. राज्य सरकारचा तो आदेश मॅटने रद्द केला. मॅटच्या सदस्या मेधा गाडगीळ यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला. गेल्या वर्षी राज्य सरकारने सेवाज्येष्ठता ठरवताना अर्जदार महिलेची प्रसूती रजा विचारात घेतली नव्हती. २०१४ ऐवजी मे २०१५ मध्ये प्रसूती रजा संपल्याचा निष्कर्ष काढला होता. त्याचा महिलेच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम झाला, याकडे अर्जदार महिलेने मॅटचे लक्ष वेधले होते. त्यावर मॅटने प्रोबेशन कालावधीतील महिला कर्मचाऱ्यांच्या प्रसूती रजेच्या हक्कावर शिक्कामोर्तब केले. प्रोबेशनवर असताना महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा घेण्याच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही, असा निर्णय मॅटने दिला. अर्जदार महिला सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विभागीय वन संरक्षक आहे. तिने २०१५ मधील राज्य सरकारच्या आदेशाला आव्हान दिले होते.
मॅटची निरीक्षणे
- महिलेची माता बनण्याची इच्छा तिचा मूलभूत मानवी व नैसर्गिक हक्क आहे. या हक्कावर कुणी गदा आणू शकत नाही. यात प्रोबेशनचाही अडथळा येऊ शकत नाही.
- कल्याणकारी, प्रगतशील महाराष्ट्राने प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला १८० दिवसांच्या प्रसूती रजेची हमी दिली आहे.
- प्रसूती रजा हा आईसोबत राहण्याचा नवजात शिशूचा जितका अधिकार आहे, तितकाच मुलासोबत असणे आईचाही अधिकार आहे.
- प्रसूती रजेच्या कारणास्तव अशा महिला कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता कमी करू शकत नाही.