वकिल परिषदेच्या महाराष्ट्र सचिवपदी अॅड. पूजा डोंगरे यांची नियुक्ती | COUNCIL OF LAWYERS
नियुक्तीची अधिकृत घोषणा; विधी क्षेत्रातील कार्याचा सन्मान
राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या वकिल परिषदेच्या महाराष्ट्र सचिव म्हणून अॅड. पूजा अनंत डोंगरे यांची नियुक्ती झाली आहे. परिषदेचे राष्ट्रीय समन्वयक अॅड. अभिषेक मल्होत्रा यांनी अॅड. डोंगरे यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. तसेच नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. अॅड. डोंगरे यांच्यावर विधी क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मराठवाडा विद्यापीठातून ‘एलएलएम’पर्यंत शिक्षण घेतलेल्या अॅड. पूजा डोंगरे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठामध्ये फाैजदारी प्रकरणांत वकिल म्हणून सक्रिय आहेत. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय आणि देशातील इतर उच्च न्यायालयांत त्यांनी स्वतःच्या वकिलकीची छाप पाडली आहे. भीमा कोरेगाव प्रकरण, बदलापुरातील अक्षय शिंदे चकमक यांसारख्या प्रकरणांमुळे त्या विशेष चर्चेत आल्या. विविध प्रकरणांत त्यांनी जोरदार युक्तीवाद करुन पक्षकारांना न्याय मिळवून दिला आहे.
वकिली पेशा आणि सामाजिक क्षेत्रातील अॅड. डोंगरे यांच्या कार्याची व्याप्ती लक्षात घेत राष्ट्रीय पातळीवरील वकिल परिषदेने त्यांची महाराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. वकिल परिषदेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी लावेन आणि वकिलांच्या न्यायहक्कासाठी सदैव तत्परता दाखवेन, अशी प्रतिक्रिया अॅड. पूजा डोंगरे यांनी ‘कोर्टनामा’शी बोलताना दिली.
वकिल परिषद अर्थात ‘काैन्सिल ऑफ लाॅयर्स’ ही एक कल्याणकारी संघटना असून संपूर्ण देशभरात सक्रिय आहे. संघटनेने अल्पावधीतच देशभर मोठा विस्तार केला आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायदान केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती रितू भारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चेअरमन वासू चंडेलिया आणि प्रेसिडेंट इशान भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये वकिल परिषदेची यशस्वी वाटचाल सुरु आहे.


