मुलींना वडिलांच्या घरात राहण्याचा हक्कच; हिंदू कायद्यानुसार हा हक्क संरक्षित | BOMBAY HIGH COURT
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
मुंबई, दि. १५ ऑगस्ट, २०२५ – मुलींचा वडिलांच्या घरात राहण्याचा हक्क हिंदू कायद्यानुसार संरक्षित आहे. तो हक्क हिरावून घेता येणार नाही. मुलींचा हा हक्क अबाधित ठेवण्याची नैतिक जबाबदारी वडिलांच्या मालमत्तेच्या वारसदारांवर आहे, असा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मुलीचे लग्न झाले असले तरी ती नंतर माघारी परतल्यानंतर वडिलांच्या घरात हक्काने राहू शकते. अविवाहित, विधवा व परित्यक्ता महिला वडिलांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या मालमत्तेतून उदरनिर्वाह करु शकतात, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यातील कनिष्ठ न्यायालय आणि जिल्हा अपीलीय न्यायालयाचे तीन बहिणींना दिवंगत वडिलांची मालमत्ता सोडण्यास सांगितले होते. त्यासंबंधी दिलेले आदेश उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. कनिष्ठ न्यायालयांच्या त्या आदेशांना साताऱ्यातील तीन बहिणींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांच्या अपिलावर न्यायमूर्ती गाैरी गोडसे यांच्या एकलपीठाने निर्णय दिला आहे. वडील १९५६ पूर्वी किंवा नंतर मरण पावले असले तरी मुलींना वडिलांच्या मालमत्तेवर हक्क आहे, असे न्यायमूर्तींनी या प्रकरणाच्या निकालपत्रात नमूद केले.
न्यायालयाने अपिलकर्त्या बहिणींच्या बाजूने निर्णय देताना हिंदू कायद्यातील हक्क अधोरेखित केले. अपिलकर्त्या बहिणींचे वडिल रमा यांचा मृत्यू १९५६ पूर्वी झाला. त्या अनुषंगानेही न्यायालयाने भाष्य केले आहे. मुलींच्या वडिलांचा मृत्यू १९५६ पूर्वी किंवा नंतर झाला असला तरी अपीलकर्त्या महिला मुली असल्याने त्यांचा वडिलांच्या मालमत्तेवर हक्क संरक्षित आहे. हिंदू कायद्याने त्यांना हा हक्क आहे. १९५६ पूर्वी राम किंवा त्याच्या मालमत्तेचा वारसा मिळालेल्या वारसांना संबंधित मालमत्तेतून उदरनिर्वाह करण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हटले.
नेमके प्रकरण काय?
ज्या जमिनीच्या मालकी हक्कावरुन वाद सुरु आहे, ती जमीन मूळची नाथा नावाच्या व्यक्तीची होती. त्याला राम आणि चंदर ही दोन मुले होती. कौटुंबिक हिश्श्याची वाटणी झाली, त्यावेळी ती जमीन रामाला मिळाली होती. रामाला तीन मुले आणि तीन मुली होत्या. रामा यांच्या मृत्यूपूर्वी एक मुलगी विधवा झाल्याने ती माहेरी परतली होती. तसेच इतर दोन बहिणी परितक्त्या होत्या. काही वर्षांनंतर त्या विधवा झाल्या होत्या. याचदरम्यान रामा यांच्या मुलांनी म्हणजेच दोन भावांनी वडिलांच्या मालमत्तेची वाटणी केली. त्यावेळी बहिणींना काहीही दिले नाही आणि त्या बहिणींना घराबाहेरही काढले नाही. तथापि, एका भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बायकोने बहिणींना घरातून बाहेर पडण्यास सांगितले. त्यानंतर हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात गेले होते व पुढील कायदेशीर संघर्ष सुरु झाला होता.


