नवजात बालकाच्या आईला अटक करू शकत नाही | Session Court
Last updated on August 1st, 2025 at 09:42 pm
महिलेला अटकपूर्व जामीन मंजूर – सत्र न्यायालयाचे निरीक्षण
मुंबई – चार महिन्यांच्या नवजात बालकाच्या आईला अटक करू शकत नाही, असे निरीक्षण महत्वपूर्ण सत्र न्यायालयाने नोंदवले. याचवेळी ‘खुदा हाफिज’ चित्रपटाचा दिग्दर्शक फारुख कबीरची पत्नी शोखसनम खन्ना हिला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
शोखसनम हिने मुलीचा पिता म्हणून माझी संमती न घेताच खोट्या कागदपत्रांचा वापर करून मुलीला परदेशात नेले, असा आरोप करीत फारुख कबीरने पोलिसांत तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे आझाद मैदान पोलिसांनी शोखसनम व तिचा सावत्र पिता तेजस खन्ना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अटकेची कारवाई टाळण्यासाठी शोखसनमने न्यायालयात धाव घेतली. तिच्या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. तवशीकर यांनी निर्णय दिला. हे वैवाहिक मतभेदाचे प्रकरण आहे. अर्जदार महिला चार महिन्यांच्या मुलीची आई आहे. नवजात बालकांना वडिलांपेक्षा आईच्या प्रेमाची गरज असते. त्यामुळे तिला अटकेपासून संरक्षण देणे आवश्यकच आहे. नवजात बालकाच्या आईला अटक करू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायाधीश तवशीकर यांनी शोखसनमला अटकपूर्व जामीनाचा दिलासा दिला.


