औषधांची चिठ्ठी सुस्पष्ट हवी, अक्षर समजलेच पाहिजे; हायकोर्टाचा डाॅक्टरांना झटका | HIGH COURT
औषधांची नावे नीट वाचता येत नसतील तर मूलभूत हक्कांचे उल्लंघन
रुग्णांना लिहून दिलेली औषधांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) सुस्पष्ट हवी, डाॅक्टरांनी लिहिलेले अक्षर नीट समजलेच पाहिजे. जर औषधांची चिठ्ठी सुस्पष्ट नसेल अर्थात चिठ्ठीतील औषधांची नावे नीट वाचता येत नसतील तर तो मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. रुग्णांना घाईघाईत लिहून दिलेली औषधे न समजण्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
‘सुवाच्च अक्षरातील वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन आणि निदान’ हे आरोग्याच्या अधिकाराचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच औषधांची चिठ्ठी सुस्पष्ट आणि सुवाच्च अक्षरात असणे हा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत मूलभूत अधिकार आहे, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जसगुरप्रीत सिंग पुरी यांनी म्हटले आहे. या निर्णयानुसार यापुढे जर डाॅक्टरांनी सुवाच्च अक्षरात वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन लिहिले नसेल तर रुग्ण वा रुग्णाचे कुटुंबीय मूलभूत अधिकाराचे उल्लंघन झाल्याचा दावा करुन न्यायालयात दाद मागू शकणार आहेत.
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अन्वये नागरिकांना जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार मिळतो. त्यात आरोग्याच्या अधिकाराचा समावेश आहे. वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन, निदान तसेच इतर सर्व वैद्यकीय कागदपत्रे सुवाच्च आणि सुस्पष्ट अक्षरात जाणून घेण्याचा अधिकारदेखील मूलभूत अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. जर वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन अस्पष्ट असतील तर ते रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण करते. रुग्णांना काळजी घेण्यासाठी डाॅक्टरांनी काय लिहून दिले आहे, याची योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. जर ती माहिती योग्यरित्या समजली नाही तर ते मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पावले उचलली जाणार
यासंदर्भात न्यायालयाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. संपूर्ण देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनमध्ये सुवाच्च, स्पष्ट हस्ताक्षराचे महत्त्व समाविष्ट करण्यासाठी पावले उचला, अशी सूचना न्यायालयाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला केली आहे. तसेच ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ला याबाबतीत लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे यापुढे देशभरातील सर्व डाॅक्टरांना वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन सुवाच्च आणि सुस्पष्ट अक्षरात लिहावे लागणार आहे.


