संमतीने शरीरसंबंध ठेवणे हा बलात्काराचा गुन्हा नाहीच; सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय | SESSION COURT
बलात्काराच्या आरोपातून तरुणाची निर्दोष मुक्तता
सूरत, दि. २८ ऑगस्ट, २०२५ – अनेक तरुण-तरुणी संमतीने शरीरसंबंध ठेवतात. मात्र ब्रेक-अप झाल्यानंतर तरुणी बलात्काराचा आरोप करते. त्यानंतर तरुणाला कित्येक वर्षे तुरुंगात कैद राहावे लागते. अशा प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील सूरत सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. संमतीने शरीरसंबंध ठेवणे हा बलात्काराचा गुन्हा नाहीच. संमतीने शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्नाला नकार दिला तरी तो बलात्काराचा गुन्हा ठरत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
तीन वर्षांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन तरुणाला अटक केली होती. त्या तरुणाला सूरत सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आणि त्याची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले. आरोपी तरुण आणि तक्रारदार तरुणी या दोघांनी तीन वर्षे संमतीने लैंगिक संबंध ठेवले होते. अशा स्थितीत नंतर लग्न करण्यास नकार देणे हा बलात्काराचा गुन्हा ठरत नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. त्यासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांचा हवाला वकिलांनी दिला. त्यांचा युक्तीवाद सत्र न्यायालयाने ग्राह्य धरला.
आरोपी तरुणाने तक्रारदार तरुणीशी कोणत्याही प्रकारचे जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले नव्हते. प्रेमसंबंध तुटल्यामुळे तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती, असा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. जर लग्नाचे आमिष दाखवून संमतीने शरीरसंबंध ठेवले असतील तर तो बलात्काराचा गुन्हा ठरत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्याचा संदर्भ वकिलांनी दिला. त्यांचा युक्तीवाद स्वीकारून न्यायालयाने तरुणाची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
नेमके प्रकरण काय
सुरतच्या दिंडोली परिसरातील तरुणीने कतारगाम येथील तरुणाविरुद्ध बलात्काराचा आरोप केला होता. तरुणाने इंस्टाग्रामच्या माध्यमातून तरुणीशी मैत्री केली होती. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर लग्नाला नकार दिला, असा आरोप करीत तरुणीने पोलिसांत तक्रार केली होती. त्या आधारे पोलिसांनी जुलै २०२२ मध्ये तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली होती.


