हाऊसिंग सोसायटीने झाडांची देखभाल केली पाहिजे; कोर्टाने दिला भरपाईचा आदेश | DINDOSHI COURT

Share Now

Last updated on August 14th, 2025 at 06:48 pm

मुंबई, दि. ११ ऑगस्ट, २०२५ ः हाऊसिंग सोसायटीने आपल्या संकुलातील झाडांची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे. सोसायटीच्या आवारातील झाडांमुळे कोणतीही जिवीतहानी घडल्यास सोसायटीला जबाबदार धरले जाऊ शकते. यासंदर्भात दिंडोशी दिवाणी न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. अंधेरीतील एका सोसायटीच्या आवारातील नारळाचे झाड पडून तरुणाचा मृत्यू झाला होता. मृत तरुणाच्या वडिलांना २० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने संबंधित गृहनिर्माण संस्थेला दिले. हा दुर्मिळ निर्णय सर्व गृहनिर्माण संस्थांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. 

कुर्ला येथील २७ वर्षीय रोहित जाधव हा तरुण काम संपवून अंधेरी रेल्वे स्थानकाकडे चालत जात होता. वाटेत त्याच्या अंगावर नारळाचे झाड पडले. त्यात त्याचा मृत्यू झाला. १८ जुलै २०१२ रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी सत्यदर्शन सहकारी गृहनिर्माण संस्थेने पालिकेकडे बोट दाखवले होते. वारंवार विनंती केल्यानंतरही पालिकेने मृतावस्थेतील झाड तोडण्यासाठी परवानगी दिली नाही, असा दावा गृहनिर्माण संस्थेने केला होता. न्यायालयाने सोसायटीचा हा युक्तीवाद अमान्य केला.

पालिकेने नारळाचे धोकादायक झाड तोडण्याची परवानगी आधीच दिली आहे. सोसायटीचे सदस्य तसेच रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ते धोकादायक झाड हटवणे हे सोसायटीचे कर्तव्य आहे, असे निरिक्षण दिवाणी आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र लाेखंडे यांनी नोंदवले. याच आधारे न्यायालयाने मृत तरुणाच्या वडिलांना २० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 

नेमकी घटना काय घडली होती?

नारळाचे झाड कोसळून मृत्यूमुखी पडलेला रोहित हा तरुण अंधेरी पूर्वेकडील एका खाजगी कंपनीत काम करीत होता. १८ जुलै २०१२ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता तो त्याच्या मित्रासोबत ऑफिसमधून बाहेर पडला होता. नंतर काही मिनिटांनी झाड कोसळण्याची घटना घडली होती. रोहितच्या डोक्यावर मार लागला होता. त्यामुळे तो बेशुद्ध पडला होता आणि प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. त्याला होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये नेले होते. तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. 




Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *