विभक्त पत्नी माहेरी राहिली तरी तिला घरभाडे दिले पाहिजे | High Court

हायकोर्टाचा पतीला झटका

Last updated on July 15th, 2025 at 09:37 pm

मुंबई – विभक्त पत्नी माहेरी तिच्या कुटुंबियांसोबत राहिली तरी पतीने तिला पर्यायी निवासासाठी घरभाडे दिलेच पाहिजे, असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. याचवेळी विभक्त पत्नीला ३० हजार रुपयांचे घरभाडे देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले आणि अपीलकर्त्या पतीला झटका दिला.

लालबाग येथील जितेश पाटीलने (नाव बदललेले) दिंडोशी सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी निकाल दिला. जितेशचे १२ मार्च २००९ रोजी स्नेहलशी लग्न झाले होते. लग्नानंतर ते लालबाग येथील सामायिक घरात राहत होते. दाम्पत्याला ९ मे २०११ रोजी मुलगी झाली. पती व सासरच्या इतर मंडळींनी छळ केल्यानंतर स्नेहलने २८ एप्रिल २०१२ रोजी सासर सोडून माहेर गाठले. यादरम्यान तिने कौटुंबिक छळाची तक्रार केली. तसेच वैवाहिक संबंध संपुष्टात आणण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका केली. ही याचिका प्रलंबित असताना दंडाधिकारी न्यायालयाने तिला अंतरिम पोटगी व पर्यायी निवासासाठी घरभाडे मंजूर केले. तो आदेश दिंडोशी सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे पती जितेशने उच्च न्यायालयात धाव घेतली. तथापि, कनिष्ठ न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दिलेला निर्णय योग्यच आहे. विभक्त पत्नी माहेरी राहिली तरी तिला पतीने पर्यायी निवासासाठी घरभाडे दिलेच पाहिजे, असा निर्णय न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी दिला आणि पतीचे अपील फेटाळले.

अपीलकर्ता जितेश तिच्या आईसोबत भाड्याने ३ बीएचके घरात राहत आहे. त्या घरासाठी तो ४५ हजार रुपये भाडे देत आहे. विभक्त पत्नी तिच्या भाऊ व आई-वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहत आहे. पत्नी माहेरच्या मंडळींसोबत राहत असल्याच्या कारणावरून जितेशने तिला घरभाडे देण्यास नकार दिला होता. कनिष्ठ न्यायालयाने विभक्त पत्नी व तिच्या मुलीला पोटगीच्या रूपात ६० हजार रुपये तसेच घरभाड्यापोटी ३० हजार रुपये मंजूर केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *