नातवाला ताब्यात ठेवण्याचा आजीला कायदेशीर अधिकार नाही; हायकोर्टाचा निर्णय | BOMBAY HIGH COURT

Share Now

मुंबई, दि. ५ ऑगस्ट, २०२५ – आजी आणि नातवंडांमध्ये घट्ट भावनिक नाते असते. मात्र त्या नात्याच्या आधारे आजी नातवाला ताब्यात ठेवण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार सांगू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. आजी-आजोबांचे नातवाशी असलेले भावनिक नाते त्यांना नातवाला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने जैविक पालकांपेक्षा जास्त अधिकार देत नाही, असे न्यायालयाने म्हटले. याचवेळी ७४ वर्षीय आजीबाईला पाच वर्षांच्या नातवाचा ताबा त्याच्या पालकांकडे सोपवण्याचे निर्देश दिले.   

वृद्ध महिलेचा मालमत्तेवरून मुलाशी वाद सुरू झाला. त्या वादामध्ये मुलाने आईला नातवाचा ताबा सोडण्यास सांगितले. मात्र वृद्ध महिलेने नातवाचा ताबा सोडण्यास नकार दिल्यानंतर तिच्या मुलाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुलाच्या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने लहान मुलाच्या ताब्याबाबत आजी-आजोबांपेक्षा आई-वडिलांना अधिक कायदेशीर अधिकार असल्याचे स्पष्ट केले. त्याच अनुषंगाने वृद्ध महिलेला लहान नातवाचा ताबा त्याच्या पालकांकडे परत करण्यास सांगितले. 

वृद्ध महिलेचे मुलाशी भावनिक नाते आहे. मात्र ते नाते वृद्ध महिलेला नातवाचा ताबा ठेवण्याबाबत मुलाच्या जैविक पालकांपेक्षा वरचढ अधिकार देत नाही, असे महत्त्वपूर्ण निरिक्षण न्यायालयाने नोंदवले. मुलाच्या पालकांना त्याच्या जुळ्या भावाची काळजी घ्यावी लागत होती. तो सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त आहे. त्यामुळे मुलाला आजीच्या ताब्यात सोपवले होते. तथापि मालमत्तेवरून वाद सुरू झाल्यानंतर मुलाच्या ताब्याचा प्रश्न निर्माण झाला. त्याच अनुषंगाने न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल दिला.  

मुलाच्या आजीने याचिकेला विरोध केला आणि नातवाच्या जन्मापासून त्याची चांगली काळजी घेत असल्याचा दावा केला. नातू आणि माझ्यामध्ये घट्ट भावनिक नाते आहे, असे सांगून आजीने पाच वर्षांच्या नातवाला त्याच्या पालकांकडे सोपवण्यास नकार दिला होता. तथापि, खंडपीठाने आजीला नातवाचा ताबा ठेवण्याबाबत कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. आजीचे मुलाशी भावनिक नाते असू शकते. परंतु त्याधारे मुलाला ताब्यात ठेवण्याबाबत आजीला जैविक पालकांपेक्षा श्रेष्ठ अधिकार मिळू शकत नाही, असे खंडपीठाने आपल्या निकालपत्रात नमूद केले.

“वृद्ध आजीबाईचे मुलाशी अर्थात तिच्या नातवाशी भावनिक नाते आहे. मात्र ते नाते वृद्ध आजीबाईला नातवाचा ताबा ठेवण्याबाबत मुलाच्या जैविक पालकांपेक्षा वरचढ अधिकार देत नाही.” – उच्च न्यायालय




Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *