उतारावरील पार्किंगसाठी हॅण्ड ब्रेक आवश्यकच | Magistrate Girgaon Mumbai
Last updated on August 1st, 2025 at 09:44 pm
गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल – मुंबई
मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) – चढ-उतार असलेल्या रस्त्यावर गाडी पार्क करताना हॅण्ड ब्रेक लावण्याची खबरदारी घ्या, अन्यथा तुरुंगात रवानगी होऊ शकते. उतारावरील पार्किंगसाठी हॅण्ड ब्रेक लावणे आवश्यकच आहे. हॅण्ड ब्रेक न लावता उतारावर गाडी उभी करणे हा निष्काळजीपणाचा गुन्हा आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल गिरगावच्या दंडाधिकारी न्यायालयाने दिला आहे.
मलबार हिल परिसरातील वाळकेश्वर रोडवर उतारावर पार्क केलेला टँकर हॅण्ड ब्रेक न लावल्यामुळे मागे आला आणि तेथे उभ्या असलेल्या कारवर धडकला. २९ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात घडला होता. या अपघाताला टँकरचालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचा ठपका दंडाधिकारी नदीम पटेल यांनी ठेवला आणि टँकरचालक सकलदेव साह याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३३७ अन्वये दोषी ठरवले. आरोपीने पहिल्यांदाच अशाप्रकारचा गुन्हा केल्याने न्यायालयाने चांगल्या वर्तनाची हमी मागत १० हजार रुपयांच्या बाॅण्डवर त्याला तुरुंगातून सोडण्याचा आदेश दिला. हा निकाल देतानाच न्यायालयाने उतारावर पार्किंग करण्यापूर्वी गाडीला हॅण्ड ब्रेक लावणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले. या निकालामुळे उतारावर बेफिकीरपणे गाडी पार्क करणारे वाहनचालक पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
न्यायालयाची निरीक्षणे
- उतारावर गाडी पार्क केल्यावर चालकाने सर्वप्रथम हँड ब्रेक लावण्याची पुरेशी खबरदारी घेणे आवश्यकच आहे. जेणेकरून ती गाडी आपोआप मागे-पुढे हलूच शकत नाही.
- टँकरचालकाने हँड ब्रेक लावल्याचा दावा केला असला तरी टँकर आपोआप मागे सरकला आहे. यामागे यांत्रिक दोष नव्हे, तर टँकरचालकाने हॅण्ड ब्रेक लावला नव्हता हेच स्पष्ट होते.
सहा महिन्यांपर्यंत शिक्षा होऊ शकते
उतारावर गाडी उभी करताना पुरेशी काळजी न घेणे आणि हँड ब्रेक न लावणे हे निष्काळजीपणाचेच कृत्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. या गुन्ह्यात आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३३७ अन्वये सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.
अपघातातील जखमीला भरपाई देण्याचे आदेश
रस्त्यावर उतार असल्याचे पाहूनही टँकर पार्क केला. त्याची ही घोडचूक कारमालकाच्या जीवावर बेतणारी ठरली असती. त्यामुळे न्यायालयाने त्याला दंडाचा झटका दिला. अपघातात जखमी झालेले कारमालक झा यांना भरपाई म्हणून ५ हजार रुपये देण्याचा आदेश दंडाधिकार्यांनी टँकरचालकाला दिला.
वाळकेश्वर रोडवर नेमके काय घडले होते?
मलबार हिलचे रहिवासी मोहनकुमार झा हे मुलाला शाळेत सोडायला गेले होते. गोपी बिर्ला शाळेसमोर कार उभी करुन ते आतमध्ये बसले होते. याचदरम्यान उतारावर लावलेला टँकर आपोआप मागे आला आणि कारला धडकला. त्यात झा यांच्या पायाला दुखापत झाली व कारचे नुकसान झाले. झा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी टँकरचालक सकलदेव साहविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला होता.


