दुचाकी घसरणे हादेखील ‘अपघात’च; भरपाईबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय | BOMBAY HIGH COURT
महिलेच्या कुटुंबियांना ७.८२ लाखांची भरपाई मंजूर
मुंबई, दि. २० ऑगस्ट, २०२५ – अपघातात जखमी वा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना भरपाई देण्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. भरपाईचा दावा करताना अपघातामध्ये दोन गाड्यांचा सहभाग असण्याची आवश्यकता नाही. अपघाताला दुसरे वाहन कारणीभूत असणे आवश्यक नाही. अचानक दुचाकी घसरणे हादेखील ‘अपघात’ ठरतो. अशा अपघातातील मृत व्यक्तीचे कुटुंबिय मोटार वाहन कायद्यांतर्गत भरपाई मिळवण्यास पात्र ठरतात, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.
अपघाती मृत्यू झालेल्या विवाहित महिलेच्या कुटुंबियांना उच्च न्यायालयाने ७,८२,८०० रुपयांची भरपाई मंजूर केली. तसेच भरपाईची रक्कम वार्षिक ७.५ टक्के व्याजदराने देण्याचे आदेश प्रतिवादींना दिले. दुचाकीवरुन प्रवास करीत असताना महिलेची साडी दुचाकीच्या साखळीत अडकली होती. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर घसरुन अपघात झाला. त्यात महिलेचा मृत्यू झाला. तिच्या कुटुंबियांनी भरपाईसाठी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाकडे दावा केला होता. तथापि, न्यायाधिकरणाने भरपाई मंजूर करण्यास नकार दिला. त्या आदेशाला महिलेच्या कुटुंबियांनी आव्हान दिले होते. त्यांच्या अपिलाची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी न्यायाधिकरणाचा निर्णय रद्दबातल ठरवला.
मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाच्या म्हणण्यानुसार, केवळ दुचाकी घसरली होती. त्यात इतर कोणतेही वाहन सहभागी नव्हते. त्यामुळे त्याला अपघात म्हणता येणार नाही. न्यायाधिकरणाचा तो निर्णय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डिगे यांच्या एकलपीठाने रद्द केला.
मोटार वाहन कायद्यात अपघात या शब्दाची व्याख्या केलेली नाही. लेक्सिस नेक्सिसनुसार, अपघात म्हणजे एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवणारी अनपेक्षित घटना असते. त्यात टक्कर होणे, गाडी उलटणे किंवा घसरणे यांचा समावेश आहे. अपघात घडण्यासाठी दुसऱ्या गाडीचा सहभाग असणे गरजेचे नाही, असे निरिक्षण न्यायमूर्ती डिगे यांनी अंतिम निर्णय देताना नोंदवले.


