पोलिसाशी वाद घालणे म्हणजे कर्तव्यात अडथळा आणणे नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय | HIGH COURT
भादंवि कलम ३५३ अंतर्गत गुन्ह्याबाबत निर्वाळा
हैदराबाद, दि. १९ ऑगस्ट, २०२५ – पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार अनेकदा घडतात. काहीवेळेला पोलिस निष्कारण त्रास देतात. त्यावरुन लोक पोलिसांशी वाद घालतात. अशा प्रकरणांत पोलिस भादंवि कलम ३५३ अंतर्गत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करतात. याच पार्श्वभूमीवर तेलंगणा उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घालणे म्हणजे शासकीय कर्तव्यात अडथळा आणणे नव्हे. अशा प्रकरणांत पोलिस कोणाविरुद्धही भादंवि कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करु शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल कुमार जुकांती यांनी हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. ज्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा आणला जातो, त्यावेळी भादंवि कलम ३५३ अंतर्गत गुन्हा नोंदवला जातो. मात्र कुणी पोलिसाशी वाद घातला, स्वतःची बाजू मांडण्याच्या प्रयत्नात हुज्जत घातली, तर ते कृत्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याचा गुन्हा ठरत नाही, असे निरिक्षण न्यायमूर्ती जुकांती यांनी नोंदवले आहे.
तेलंगणा येथील रहिवासी अक्किनेनी राजशेखर यांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी घेतली. राजशेखर यांच्याविरुद्ध मंगपेट पोलिसांनी भादंवि कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. राजशेखर यांनी शेजाऱ्याशी झालेल्या जमिनीच्या वादात हस्तक्षेप करणाऱ्या एका पोलिस कॉन्स्टेबलशी वाद घातला होता. वाद घालण्याच्या अशा प्रकरणांत भादंवि कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला गेला तर तो कायद्याचा गैरवापर होईल, असे निरिक्षण नोंदवत न्यायालयाने याचिकाकर्त्या राजशेखर यांना दिलासा दिला.
जेव्हा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यावर सरकारी कर्तव्ये पार पाडण्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर केला जातो, केवळ त्याचवेळी भादंवि कलम ३५३ लागू होते. केवळ पोलिसाशी वाद घालण्याचे कृत्य या कलमाच्या कक्षेत आणता येत नाहीत, असे न्यायमूर्ती अनिल कुमार जुकांती यांनी निर्णय देताना नमूद केले. या निर्णयाने पोलिसांच्या मनमानी कारवाईला चपराक बसली आहे.


