न्यायव्यवस्थेत कोल्हापूरचा ठसा! | BOMBAY HIGH COURT

Share Now

उच्च न्यायालयाच्या मुंबईतील खंडपीठाची ऐतिहासिक वास्तू नेहमीच पक्षकारांच्या गर्दीने गजबजलेली असायची. केवळ वास्तूमध्ये नव्हे तर बाहेरील परिसरात राज्याची वैविध्यपूर्ण संस्कृती दिसायची. कोर्टाच्या पायऱ्यांवर, प्रवेशद्वारावर न्यायाची प्रतिक्षा करणाऱ्या विविध भागांतील जनतेमुळे त्या-त्या भागातील भाषेचा गोडवा, आपलेपणा अनुभवायला मिळायचा. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांतील जनता अधिक असायची. आज-ना-उद्या न्याय मिळेल, या अपेक्षेने त्या जनतेला प्रत्येक तारखेला गाव ते मुंबई असे खेटे मारावे लागत होते. आता ते हेलपाटे टळतील, त्यांना वेळीच न्याय मिळेल. ही आशा पल्लवीत झालीय ती कोल्हापूर सर्किट बेंच अर्थात कोल्हापूर खंडपीठाच्या निर्मितीमुळे. रविवारी, १७ ऑगस्ट २०२५ रोजी देशाचे सरन्यायाधीश तथा महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांच्या शुभहस्ते कोल्हापूर खंडपीठाचे उद्घाटन होत आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूरचा नव्या खंडपीठाच्या रुपात न्यायव्यवस्थेतही ठसा दिसणार आहे.

तब्बल ४० वर्षांच्या सततच्या मागणीनंतर अर्थात चार दशकांच्या लढ्यानंतर कोल्हापूर खंडपीठ मूर्त रुप घेणार आहे. महाराष्ट्राला मुंबई उच्च न्यायालयाचे पाचवे खंडपीठ मिळणार आहे. १८ ऑगस्ट २०२५ पासून कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये न्यायदानाचे पवित्र कार्य सुरु होणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील जनतेला न्यायासाठी आता मुंबई, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागणार नाही. कोल्हापूर खंडपीठाच्या निमित्ताने न्यायदेवता आपल्या दारी आल्याची प्रचिती इथल्या जनतेला येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात स्थानिक न्यायप्रणाली अधिक प्रभावी आणि सुलभ होणार आहे. चार दशके कागदावर राहिलेली मागणी विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पाठिंब्यामुळे पूर्णत्वास गेली आहे. कोल्हापूरसह उर्वरित पाच जिल्ह्यांतील पक्षकारांना मुंबईला जाण्यासाठी खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत होता. त्याचबरोबर वेळ वाया जायचा. ही गैरसोय गांभीर्याने विचारात घेत सरन्यायाधीश गवई यांनी कोल्हापूर खंडपीठ निर्मितीचा मार्ग सुकर केला. 

कोल्हापूरच्या नागाळा पार्क येथील मेरी वेदर ग्राऊंडवर उभारलेल्या भव्य शामियानात कोल्हापूर खंडपीठाच्या उद्घाटनाचा शानदार समारंभ पार पडणार आहे. हा सोहळा पश्चिम महाराष्ट्र, कोकणच्या जनतेसाठी संस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण असेल. सरन्यायाधीश भूषण गवई हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर खंडपीठाचे उद्घाटन करणार आहेत. या सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयातील १२ न्यायमूर्ती, निवृत्त मुख्य न्यायमूर्ती, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील न्यायालयांचे प्रधान न्यायाधीश, महाराष्ट्र-गोवा बार काैन्सिलचे पदाधिकारी-सदस्य, बार असोसिएशनचे अध्यक्ष, वकिल, सर्वपक्षीय खंडपीठ समिती, पक्षकार समितीचे पदाधिकारी आदी जवळपास पाच हजारांहून मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

नवीन न्यायालय संकुलाचे बांधकाम केल्यानंतर वापरात नसलेल्या न्यायालयाच्या जुन्या इमारतीचे कोल्हापूर खंडपीठासाठी नूतनीकरण केले आहे. महाराष्ट्राच्या न्यायिक नकाशात कोल्हापूरला ऐतिहासिक स्थान आहे. १८४४ मध्ये संस्थानने स्वतःचे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय स्थापन केले. १५० वर्षांहून अधिक जुनी जिल्हा न्यायालयाची इमारत या वारशाचा पुरावा आहे. २०१६ मध्ये ‘न्यायसंकुल’ संकुलाचे उद्घाटन झाले होते. आता कोल्हापूर खंडपीठाच्या निर्मितीमुळे स्थानिक जनता, वकिल तसेच विधी शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. इथल्या समाजाच्या प्रत्येक घटकाच्या आयुष्याला नवीन खंडपीठामुळे कलाटणी मिळणार आहे. कोल्हापूरचा न्यायव्यवस्थेत दरारा वाढणार आहे. 




Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *