सावंतवाडीतील आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्या; हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाचे सरकारला निर्देश | BOMBAY HIGH COURT
उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज आयसीयू असल्याचा सरकारचा दावा
मुंबई-गोवा महामार्गावरील सावंतवाडी (sawantwadi) उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेची उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठाने गंभीर दखल घेतली. सावंतवाडीतील आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्या, असे सक्त निर्देश खंडपीठाने राज्य सरकारमधील आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि ट्रामा केअर युनिट कार्यान्वित असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. त्यानंतर खंडपीठाने सरकारला आठवडाभरात प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत पुढील सुनावणी २५ सप्टेंबरला निश्चित केली.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील (sindhudurg district) सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अनेक मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. सर्वसामान्य जनता, गोरगरीब रुग्णांना मुलभूत वैद्यकीय सुविधादेखील मिळत नाहीत. ही गंभीर वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत अभिनव फाऊंडेशन संस्थेने २०१३ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी अभिनव फाऊंडेशन संस्थेतर्फे अॅड. महेश राऊळ यांनी जोरदार युक्तिवाद केला.
गेल्या चार महिन्यांत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ७४५ रुग्णांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे गोव्यातील बांबुळी (bambuli) येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमधून दाखल केलेल्या रुग्णांचा हा आकडा आहे. याव्यतिरिक्त इतर खासगी वाहनांमधून गेलेल्या रुग्णांची संख्या विचारात घेतल्यास एकूण रुग्णांचा आकडा आणखी मोठा होईल. दिवसाला किमान सहा रुग्ण बांबुळी रुग्णालयात पाठवले जात आहेत, असे अॅड. राऊळ यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
सुनावणीवेळी सरकारी वकिल नेहा भिडे यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज अतिदक्षता विभाग आणि ट्रामा केअर युनिट कार्यान्वित असल्याचा दावा केला. त्यावर याचिकाकर्त्या अभिनव फाऊंडेशनतर्फे अॅड. राऊळ यांनी जोरदार आक्षेप घेतला. आरोग्य विभाग आयसीयू कार्यान्वित केल्याचा दावा करतेय. मात्र तिथे तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. मुलभूत वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून रुग्ण गोव्यात बाबुंळी रुग्णालयात पाठवले जात आहेत. कारिवडे येथील परशुराम पोखरे या तरुणाचा गेल्या महिन्यात ३ ऑगस्टला अपघात झाला. त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार मिळू शकले नाहीत. वेळेवर रुग्णवाहिका मिळू शकली. उपचाराअभावी बांबुळीला जात असतानाच त्याचा मृत्यू झाला. ही बाब अतिशय गंभीर आहे. जिल्ह्यातील सामान्य जनतेला न्याय मिळणार कधी, असा प्रश्न अॅड. राऊळ यांनी उपस्थित केला.
उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेबाबत खंडपीठाने कठोर भूमिका घेताच सरकारी वकिल नेहा भिडे यांनी यासंदर्भात सविस्तर म्हणणे मांडण्यासाठी आठवडाभराचा अवधी मागितला. सरकारला तसा वेळ देतानाच खंडपीठाने आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याचे सक्त निर्देश दिले. सुनावणीवेळी आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील हजर होते. याप्रकरणी २५ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार असून त्याकडे सिंधुदूर्गवासियांचे लक्ष लागले आहे.


