मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती होणार | BOMBAY HIGH COURT
सुप्रीम कोर्टाच्या काॅलेजियमची शिफारस
मुंबई, दि. २६ ऑगस्ट, २०२५ – मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या काॅलेजियमने केली आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असलेले न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचे मूळ न्यायालय झारखंड उच्च न्यायालय आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय कॉलेजियमची २५ ऑगस्ट रोजी बैठक झाली. त्या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यांच्या जागी न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची नियुक्ती केली जाणार आहे.
काॅलेजियममध्ये सरन्यायाधीशांसह न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांचा समावेश आहे. कॉलेजियमच्या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून सहा अतिरिक्त न्यायमूर्तींची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली. त्यात अतिरिक्त न्यायमूर्तींमध्ये न्यायमूर्ती संजय आनंदराव देशमुख, न्यायमूर्ती वृषाली विजय जोशी, न्यायमूर्ती अभय जयनारायणजी मंत्री, न्यायमूर्ती श्याम छगनलाल चांडक, न्यायमूर्ती नीरज प्रदीप धोटे आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांचा समावेश आहे.
मुंबई उच्च न्यायालयाप्रमाणे केरळ उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती जॉन्सन जॉन, न्यायमूर्ती गोपीनाथन उन्नीथन गिरीश आणि न्यायमूर्ती चेल्लाप्पन नादर प्रथीप कुमार या तीन अतिरिक्त न्यायमूर्तींच्या नियुक्तीच्या प्रस्तावालाही सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मान्यता दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयात मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित आहेत. त्या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी न्यायमूर्तींच्या नियुक्तीमुळे मोठी मदत होणार असल्याचे न्यायालयीन क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.


