लोकल ट्रेनच्या असुरक्षित प्रवासाचा प्रश्न पोहोचला हायकोर्टात; जनहित याचिका दाखल | BOMBAY HIGH COURT

Share Now

Last updated on August 14th, 2025 at 06:44 pm

मुंबई, दि. १३ ऑगस्ट, २०२५ – ‘मुंबईची जीवनवाहिनी’ असलेल्या उपनगरी रेल्वे अर्थात लोकल ट्रेनच्या असुरक्षित प्रवासाचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. जून महिन्यात मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लाखो प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करणारी जनहित याचिका दिवा येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे यांनी दाखल केली आहे. याचिकेवर लवकरच द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

मध्य रेल्वे मार्गावरील ठाण्यातील दिवा जंक्शन आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकांदरम्यान विशेष लोकल ट्रेन सेवा सुरू करण्यात यावी, तसेच प्रत्येक रेल्वे स्थानकांवर रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत न्यायालयाने निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्ते अमोल केंद्रे यांनी जनहित याचिकेतून केली आहे. 

दिवा जंक्शन रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी खचाखच गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. या लाखो प्रवाशांच्या जीवाला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. लोकल प्रवासाची ही अत्यंत गंभीर परिस्थिती असतानाही रेल्वे प्रशासनाने दिवा जंक्शन येथून विशेष लोकल सेवा सुरू करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. महसूलाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि ऐतिहासिक स्थानक असलेले दिवा जंक्शन रेल्वे स्थानक मूलभूत सुविधांच्या बाबतीत दुर्लक्षित आहे, असे जनहित याचिकेत म्हटले आहे.


सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे यांच्यावतीने अॅड. प्रभातकुमार दुबे व अॅड. स्नेहल पांडे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. १० नोव्हेंबर २०१४ रोजी उच्च न्यायालयाचे आदेश तसेच महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्या निर्देशानंतरही रेल्वे स्थानकांवर रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध नाही. ९ जून २०२५ रोजी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका नसल्यामुळे जखमींना टेम्पोने रुग्णालयात नेण्यात आले, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. 




Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *